जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला सविस्तर वाचा…

कुसुमाग्रजांची एक कविता आहे. जिचं नाव जालियनवाला बाग असंय. त्यात एक ओळ अशी आहे की,
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकांत
जगज्जेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्तीपद रीत
जालियनवाला बागेत जे हत्याकांड झालं त्यावर आधारित ही कविता आठवण्याचं कारण म्हणजे, आज सरदार उधम सिंग यांची जयंती. आता या जयंतीचा आणि जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर उधम सिंग यांचा धाडसी लढा आणि या हत्याकांडाशी असलेला संबंध हे आपण जाणून घेऊ. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
सगळंच विस्ताराने जाणून घेऊ पण त्याआधी आपल्याला रौलट कायदा समजून घ्यावा लागेल. तर काळ होता पहिल्या महायुद्धाचा. ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या तिथे ब्रिटिशविरोधी कारवाया वाढीस लागलेल्या. ह्यांना आळा बसावा म्हणून, उपाययोजना करण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीचा प्रमुख म्हणून न्यायाधीश असलेल्या सिडने रौलट याला नेमण्यात आलं. या समितीच्या शिफारसींवरून १९१९ साली एक कायदा करण्यात आला. ज्याला रौलट ॲक्ट असंही म्हणलं जातं. या कायद्यानुसार, केवळ संशयावरून, पोलिस कोणालाही अटक करू शकत होते. कोणताही खटला न भरता तुरुंगात दोन वर्षांपर्यंत डांबून ठेवण्याचा अधिकार पोलिसांना दिला गेला. याविरोधात महात्मा गांधींनी सत्याग्रह सुरू केला. देशभरात या कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. गांधीजींच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी अमृतसरमध्ये सभा आयोजित करण्यात आली. आता या सभेआधीच तिथल्या प्रशासनानं मार्शल लॉ लावला. त्यानुसार चार पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली गेली. तरीही ब्रिटिशांची दडपशाही न जुमानता, बैसाखी सणाच्या निमित्ताने लोक जमले.वीस हजारांहून अधिक लोक तिथं जमले. लाला हंसराज यांचं भाषण सुरू होतं. तितक्यात ९० सैनिकांच्या मदतीने या जमावावर गोळीबार करण्यात आला. जवळपास दहा मिनिटं चाललेल्या या गोळीबारात बरीचशी माणसं मारली गेली. या सगळ्यात काही लोकांनी जीव वाचवला.त्यापैकी एक तरुण म्हणजे सरदार उधम सिंग. आता थोडंसं या तरुणाच्या बालपणाकडे वळू. पंजाब जिल्ह्यातील आजचा संगरुर जिल्हा. या जिल्ह्यातील सुनाम या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणी शेरसिंग असं त्यांचं नाव होतं. त्यांच्या आईवडिलांचे लहानपणीच निधन झाले. पुढे अनाथाश्रमात त्यांचे पालनपोषण झाले. उधमसिंग मॅट्रिक होऊन अमेरिकेला गेले. तिथं त्यांचा संपर्क गदर चळवळीशी आला. अमेरिकेतील भारतीयांनी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली ही चळवळ. या माध्यमातून त्यांचा भगतसिंहांशी संपर्क आला. त्यांच्याच सांगण्यावरून उधमसिंग भारतात परतले. भारतात आल्यानंतर गदर दी गुंज ही पत्रिका प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला आणि लढा सुरू ठेवला. याच दरम्यान बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलं आणि पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. तिथून सुटल्यानंतर मोहम्मदसिंग आझाद हे नाव धारण करून सशस्त्र लढ्यात सामील झाले. पुढे जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी उधमसिंग इंग्लडला गेले. ज्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळी ओडवायर हा पंजाबचा गव्हर्नर होता. जनरल डायर यानं हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर त्याचं समर्थन ओडवायरने केलं होतं. याचा राग मनात ठेवून उधमसिंग यांनी इंग्लडमध्ये कट रचण्यास सुरुवात केली. छोटी मोठी कामं करत त्यांनी उदरनिर्वाह चालू ठेवला. ओडवायर एका कार्यक्रमाला संबोधित करणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. उधमसिंग यांनी पिस्तुलाची जमवाजमव केली आणि सभागृहात प्रवेश करून ओडवायरवर गोळ्या झाडल्या. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला १३ मार्च १९४० रोजी घेतला गेला. गोळ्या झाडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर ओडवायरच्या हत्येचा खटला चालून लंडनच्या पेंटोनविले जेलमध्ये त्यांना फाशी दिली गेली.शहीद सरदार उधमसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बात बंजारे चॅनेलला सबस्क्राइब करा.